‘…तर पवारांवर जपून बोला’ : संजय राऊत

0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे.

पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील तो आवडलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचा घटक पक्ष व्हायचे असेल तर आघाडीतल्या नेत्यांविषयी आदर राखून बोलावे, असा इशारा दिला आहे. 

शरद पवार यांचे आजही भाजपशी संबंध आहेत फडणवीस – अजितदादा शपथविधीच्या वेळीही ते दिसून आले होते, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले होते.

या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांचा बचाव करताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोफा डागल्या आहेत.

त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना शरद पवारांवर जपून बोलण्याचा सल्ला दिल्याने महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या मुद्द्यावर सर्वकाही अलबेला नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. शरद पवार यांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांचे जे काही मतभेदाचे मुद्दे असतील त्यावर चर्चा करून ते सोडविता येऊ शकतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर अद्याप प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र त्याच्या आधीच संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना पवारांवर जपून बोलण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय येते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती संदर्भात याचा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.