मुंबई :शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाला आयोगाने पुरावे मागितले आहेत. निवडणूक आयोगाने 27 ऑगस्टपर्यंत शिवसेनेला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश दिले होते. तसेच 8 ऑगस्टपर्यंत शिवसेना कुणाची याबाबत पुरावे, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. या निर्देशाविरोधात आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
निवडणूक आयोगात सुरू असलेल्या कार्यवाहीला शिवसेनेने आव्हान दिले. जिथे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित आहे, तिथे खरी शिवसेना कोण हे आयोग ठरवू शकत नाही असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे. याच आधारावर ते न्यायालयात जात आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना थेट भाष्य टाळले, पण प्रत्येकाला लोकशाहीत न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यांना दाद मागण्याचा अधिकार आहेत. त्यावर मला काही बोलायचे नाही असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यांची कायदेशीर टीम तयार आहे. ते लवकरच हस्तक्षेप याचिका न्यायालयात दाखल करणार आहेत. शिवसेना कुणाच्या हक्काची याबाबत पुरावे द्यावे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. याच निर्देशाविरोधात शिवसेना कोर्टात जाणार आहे. यासंदर्भातील अर्ज आज किंवा उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.