पिंपरी : राज्यात तंबाखूजन्य गुटख्याच्या विक्रीला बंदी असताना, त्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करुन विक्री करणाऱ्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 5 लाख 72 हजार 448 रुपये किंमतीच्या गुटख्यासह इतर ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
चाकण म्हाळुंगे चौकीच्या हद्दीत छापा टाकून 1लाख 95 हजार 388 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. तर सुशील उर्फ राधेशाम गुप्ता (32, रा. म्हाळुंगे), रामा चौधरी (25, खालूब्रे) आणि ओमप्रकाश उर्फ ओमजी बिष्णोई (45) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून 3 लाख 77 हजार 90 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी समीर दत्तात्रय गाडे (38, रा. मावळ) आणि कल्लू उर्फ कृष्णमूर्ती राजेंद्र गुप्ता (36, रा. चाकण) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिरोदे, अंमलदार विजय कांबळे, नितीन लोंढे, भगवंता मुठे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.