पिंपरी : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात दिल्ली येथील 2 तर छत्तीसगड येथील 1 अशा एकूण तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. याबाबत जॅक, बबलू आणि करण नावाच्या व्यक्तिंविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक नावाचा व्यक्ती व्हॉट्सअॅपवरून सेक्स रॅकेट चालवत होता. तो ग्राहकांना तिन्ही तरुणीचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवत होता. त्यापैकी आवडलेल्या तरुणीच्या नावावर रुम बुक करत होता. संबंधित मुलीला हॉटेलमध्ये पाठवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत होता. आरोपी तरुणींना एका रात्रीचे 13 ते 20 हजार रुपये, तर दिवसाला एका तासाला 5 ते 9 हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल कामिनी येथे व्हॉट्सअॅपवरुन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी तीन मुलींची सुटका करुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांच्या पथकाने केली.