पिंपरी : आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील नागरिकांच्या विदयुत समस्यांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपआपल्या भागातील विविध समस्यांचा पाढा आमदार बनसोडे यांच्या पुढे मांडला. वीज विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करा अशा सूचना आमदार बनसोडे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, निगडी प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता श्री झोडगे, आकुर्डीचे कार्यकारी अभियंता श्री. कवडे, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ. भोसले, चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. जाधव, पिंपरीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चाकूरकर, प्राधिकरण सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चौधरी , माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका माई काटे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे , आशा शिंदे, इखलास सय्यद, गंगाताई धेंडे, हिरालाल जाधव आदि उपस्थित होते.
माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिपरी विभागातील उघड्या डी. पी. बॉक्सची समस्या सांगत पिंपरीमध्ये होणाऱ्या वीज चोरी बाबत लक्ष वेधले. यानंतर दापोडीच्या नगरसेविका माई काटे यांनी दापोडी परिसरात अंडर ग्राऊंड केबलींग करण्याचे निवेदन दिले. आकुर्डी व दत्तवाडी परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तातडीने होत नसल्याचे इखलास सय्यद यांनी निदर्शनास आणले. विद्युत समिती सदस्य हिरालाल जाधव यांनी गांधीनगर भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. तसेच दर पंधरा ते वीस दिवसांनी मेन सप्लायची संपूर्ण वायर जळून जात असल्याने त्या नंतर पूर्ण दोन दिवस गांधीनगर अंधारात जाते व हे सातत्याने घडत असल्याचे जाधव म्हणाले.
नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे. तसेच दापोडी व बोपखेलसाठी वेगवेगळा स्टाफ असावा. जेणे करून त्या त्या भागातील समस्यांचे निराकरण तात्काळ होईल अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच पुढील आठवड्यात दापोडी, पिंपरी, गांधीनगर, आकुर्डी, दत्तवाडी या भागाचा दौरा करून तेथील सर्व डीपी बॉक्स, विद्युत तारा यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे सांगितले.