पुणे : समर्थ पोलिसांनी कधी डिलिव्हरी बॉय तर कधी दूधवाला बनवून सराईत गुन्हेगारांची माहिती काढली आणि मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात 11 महिने फरार असणाऱ्या दोघा सराईतांना पकडले आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी वेशभूषा केली आणि त्याची माहिती गोळा केली. त्यानंतर या दोघांना पकडण्यात यश आले आहे. शुभम दिपक पवळे (२४, रा. दत्तवाडी) व आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (२२, रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की समर्थ पोलिस ठाण्यात एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर यातील दोन आरोपी अकरा महिन्यापासून फरार होते. पोलिस त्यांच्या मागावर होते परंतु ते सातत्याने पोलिसांना चकवा देत होते.
तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक संदिप जोरे व पथक या दोघांच्या मागावर होते. दोघांची माहिती गोळा करण्यासाठी पथकाने चक्क वेशांतर करून माहिती गोळा केली. काही दिवस झोमॅटो डिलव्हरी बॉय तर कधी दुधवाला तसेच कधी मॅकेनिक झाले. त्या-त्या परिसरात वेशांतर केल्यानंतर या दोघांची माहिती गोळा केली. त्यात चार वेगवेगळी ठिकाणे या दोघांची मिळाली.
वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चार पथके तयार केली. एकाचवेळी चारही ठिकाणी छापा टाकला. त्यातील दोन ठिकाणी हे दोघे मिळून आले. त्यानुसार, त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटककरून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.