बोला…मी अनिल देशमुख बोलतोय काय मदत हवी

0
पुणे : पुणे पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसून नवीन वर्षात आलेला नागरिकाचा पहिला कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्विकारला आणि मदत केली.

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील शिवसागर सोसायटी येथून पहिला कॉल आला. ‘बोला… मी अनिल देशमुख बोलतोय काय मदत हवी’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर फोनवर समोरील व्यक्तीने आपल्या शेजारी मोठ्या आवाजात साऊंडचा आवाज येत असल्याची तक्रार केली. त्यावर लगेचच पोलिसांना आपल्या मदतीला पाठवतो असे गृहमंत्र्यांनी फोनवर बोलणाऱ्या इंद्रनील आपटेंना सांगून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी आणि त्यांच्या मार्शलने घटना स्थळी जाऊन तक्रारीचे निरसन केले. त्याबरोबरच वायरलेसच्या माध्यमातून सर्व पोलिसांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना पोलिस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. म्हणूनच गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात कट्रोल रूमला आलेला पहिला कॉल स्विकारून समोरून आलेल्या कॉलला हॅलो मी अनिल देशमुख बोलतोय असे उत्तर देत… तुमची काय तक्रार आहे अशी विचारणाही केली. तसेच यावेळी केक कापून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.