पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मोदींच्या या दौऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वागताची लगबग सध्या देहू संस्थानतर्फे सुरू आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे त्याची तयारी सुरू आहे.
देहू संस्थान विश्वस्तांच्या विनंतीनुसार मुरूडकर झेंडेवाले यांच्या वर्कशॉपमध्ये या पगड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या पगड्या वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यासाठी खास रिसर्च करण्यात आला आहे. आणि त्यानुसार या पगड्या तयार करण्यात आल्या आहेत. या पगड्यांवर पारंपारिक पद्धतीने हस्तलिखित गाथा कारागिरांनी लिहिले आहे.
या पगडी विषयी माहिती देताना मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, डिझायनर तुकाराम पगडी ही भपकेबाज नसून पारंपारिक राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशीच पगडी तयार करणार आहोत. त्यासाठी खास पद्धतीचे कापड आम्ही वापरणार आहोत. ही पगडी घातल्यानंतर गंध टिळा वेगळा लावण्याची गरज पडणार नाही. या पगडीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार जगभर पोहोचावेत, असा आमचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.