पुणे : पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलातील च्या जवानाने आपल्याकडील एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारुन आत्महत्या केली. पुष्कर शिंदे (३६, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
पुष्कर शिंदे हे एसआरपीएफ गट क्रमांक २ च्या प्लाटून नं. १ मध्ये कार्यरत होते. मंत्रालय मेन गेट येथे बंदोबस्तासाठी असलेल्या स्ट्रायकिंग क्रमांक ३ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिंदे हे मुळचे रत्नागिरीचे असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी शिंदे हे सुट्टीवरुन कामावर हजर झाले होते.
सोमवारी रात्रपाळी केल्यानंतर मंगळवारी सकाळी प्लाटून डोंगरी येथील पालिका शाळेत विश्रांतीला आली होती. शिंदे हे सकाळी ८ ते १० यावेळेत गाडीवर गार्डसाठी तैनात होते. सकाळी पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायर्यांवरच शिंदे यांनी आपल्याकडील एसएलआर रायफलमधून मानेखाली गोळी मारुन घेतली.
अचानक झालेल्या गोळीच्या आवाजाने त्यांचे सहकारी धावत बसजवळ आले. तेव्हा शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी शिंदे यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेले. परंतु, तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शिंदे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.