पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगेसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष व स्वीय सहाय्यकाच्या घरावर छापे टाकले. आज स्थायी समितीचे अध्यक्षासह पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलांनी 4 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना शनिवारी (दि.21) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपीक व स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया (Vijay Shambhulal Chawria), संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे असे पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केली आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेयचे आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपी हे स्थायी समिती अध्यक्ष असून त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का ? किंवा त्यांनी इतरांना अशा प्रकारे लाच मागितली आहे का याबाबत तपास करायचा आहे.
या गुन्ह्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी पडताळणी दरम्यान ज्ञानेश्वर पिंगळे यांना तक्रारदार यांनी 3 टक्क्यामध्ये कमी करुन दोन टक्के करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पिंगळे यांनी पैसे वर 16 जणांना द्यावे लागतात असे सागितल्याचे रेकॉर्ड आहे. त्यामुळे ते 16 लोक कोण आहेत याचा सखोल तपास करणे बाकी आहे. पडताळणीमध्ये स्वत: नितीन लांडगे यांनी 3 टक्के ऐवजी 2 टक्के करा असा आदेश पिंगळे यांना दिला. या दोघांमधील व्हाईस रेकॉर्ड आहे.
स्थायी समती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरु आहे. त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. याशिवाय त्यांची इतर मालमत्ता असल्याची माहिती असून ती शोधायची आहे. हे एक मोठे रॅकेट असून त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास करायचा आहे.
सापळा कारवाईमध्ये ज्ञानेश्वर पिंगळे यांची अंगझडती व कार्यालयाची झडती घेतली असता 5 लाख 68 हजार 560 रुपये रोख मिळाले आहेत. या रकमेपैकी 5 लाख 20 हजार स्थायी समीती अध्यक्ष यांनी नुकतेच दिल्याचे पिंगळे यांनी सांगितले. परंतु त्याबद्दल समधानकारक खुलसा पिंगळे यांनी केलेला नाही. या रक्कमेचा तपास करायचा आहे. सापळा कारवाई दरम्यान राजेंद्र शिंदे यांच्याकडे 24 हजार 480 रुपये रोख रक्कम सापडली असून याही रक्कमेचा तपास करायचा आहे. याशिवाय टेंडर प्रक्रिये संदर्भातील कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. अटक करण्यात आलेल्यांच्या वतीनं अॅड. प्रताप परदेशी यांनी पोलिस कोठडी देण्यास विरोध केला.