स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन मंजूर

0

पुणे :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २६ आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला असून त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

 

या प्रकरणातील इतर आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर २५ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आरोपींची पोलिस कोठडीत संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. गोरक्षनाथ काळे यांनी लांडगे यांच्यावतीने कामकाज पाहिले.

 

 

या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे. अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. कौटुंबिक कारण्यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. इतर आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग, ॲड. कीर्ती गुजर, ॲड. संजय दळवी यांनी कामकाज पाहिले.

 

 

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.