पिंपरी : लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी (दि. 26) फेटाळला. यामुळे त्यांची रवानगी ही येरवडा कारागृहात होणार आहे.
जाहिरातीचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडून एक लाख 18 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या प्रकरणी पाचही जणांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
सोमवारी (दि. 23) झालेल्या सुनावणी दरम्यान स्थायी समितीमधील कर्मचारी ज्ञानेश्वर पिंगळे, अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे व विजय चावरिया यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आपले नातेवाईक मयत झाल्याचे कारण दिल्याने न्यायालयाने ऍड. नितीन लांडगे यांना तात्पुरता 26 ऑगस्टपर्यंत जामीन दिला होता.
या जामीनाची मुदत संपुष्टात आल्याने गुरुवारी (दि. 26) ऍड. नितीन लांडगे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी ऍड. लांडगे यांच्या वकीलाने जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तात्पुरत्या जामीनावर बाहेर आलेल्या लांडगे यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत काही दिवस काढावे लागणार आहेत.
23 ऑगस्ट रोजी ऍड. नितीन लांडगे यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी ऍड. नितीन लांडगे यांनी आपल्या आईची आई (आजी) ताराबाई बाबूराव बोऱ्हाडे या मयत झाल्याचे कारण दिले होते. मात्र ताराबाई या ऍड. नितीन लांडगे यांच्या आईच्या आई नसून, त्या वडिलांच्या मावशी आहेत. त्यामुळे लांडगे यांनी न्यायालयात खोटी माहिती दिल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. खोटी माहिती दिल्याच्या कारणावरूनच त्यांना जामीन अर्ज आज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाचेच्या मागणीची पडताळणी करताना 16 जणांचा उल्लेख रेकॉर्डवर आला आहे. ते 16 जण म्हणजे स्थायी समितीचे 16 सदस्य आहेत. त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. तसेच अटक केलेल्या पाच आरोपी यांच्यात काही रॅकेट आहे का, याबाबतही तपास करण्यात येणार असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज पुन्हा न्यायालयास सांगितले.