नेहरुनगर जम्बो कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा : संजोग वाघेरे
कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा
मागील वर्षी करोनाचा उद्रेक झाल्याने राज्य शासनाच्या वतीने पीएमआरडीए, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्तिक नियोजनातून नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये अद्ययावत जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. हे 816 बेडचे रुग्णालय 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाले. नंतर रुग्णसंख्या घटल्यानंतर पुन्हा 1 जानेवारी 2021 पासून बंद केले होते. त्यानतंर शहरात करोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा वाढू लागला आहे. महिनाभरात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दररोज अडीच हजारांहून अधिक करोना रुग्णांची नोंद होत आहे. ही बाब विचारात घेऊन पुन्हा जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सुरुवातीला जम्बो कोविड रुग्णालयात 200 बेड कार्यन्वित करण्यात आले. नंतर 400 बेड सुरू करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु, सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तत्कारी वाढू लागल्या आहेत.
जम्बो कोविड रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची व्यवस्था आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना त्याची अधिक आवश्यकता आहे. याचे गांभीर्य ओळखून, तसेच शहराची गरज आणि रुग्णांचे जिव वाचविण्याचा हेतू लक्षात घेऊन तातडीने जम्बो कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालू करावे. त्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने नियोजन करावे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.