मुंबई ः राज्यातील नववी ते बारावीच्या ७० टक्के शाळा सुरू झाल्या असून तब्बल १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. राज्यातील ९वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या १६ हजार ४२० शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
राज्यातील मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याचे १०० टक्के प्रमाण आहे. नांदेड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशीम, भंडारा या जिल्ह्यांत ९० टक्के शाळा सुरू होण्याचे प्रमाण आहे. तर, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.
इतर ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहे, परंतु शाळेतील विद्यार्थी अजूनही तुरळक प्रमाणात आहेत, असे दिसून येत आहे. साधारणपणे २३ नोव्हेंबरनंतर राज्यात शाळा सुरू होण्याचे प्रमाण दुपटीने वाढलेले आहे.