पुणे : टीईटी परीक्षा पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले असून सायबर पोलिसांनी पेपट फुटीला मदत केल्याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. याबाबत आज दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणात स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे तपास पथकास मार्गदर्शन करत आहेत.
म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घरझडतीत TET च्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
यामुळे आरोग्य विभागाबरोबरच आता शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्यात त्याच खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांचा हात असल्याचे दिसून आले आहे.