पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नुकत्याच झालेली मुदतपूर्व बदली रद्द करावी यासाठी शहरात सामाजिक संघटनांनी वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिल्यानंतर आता थेट राज्यपालांकडे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली चुकीची, अन्यायकारक असून ती आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून करण्यात आल्याने ती रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन युर्वा मोर्चा, कष्टकरी पंचायत, भिमशाही युवा संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेकडे बदलीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आली होती.
मुदतपूर्व करण्यात आलेली बदली रद्द करून कृष्णप्रकाश यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून कायम ठेवावे, अशी मागणी माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी राज्यपालांकडे केली आहे. अन्यथा आपल्या दालनापुढे उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्यपालांना निवेदेनातून दिला आहे.
कृष्णप्रकाश हे कर्तव्यनिष्ठ,अभ्यासू आणि सभ्य गृहस्थ असून त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक बदल झाल्याचे आऱटीआय़ कार्यकर्ते नाईक यांनी म्हटले आहे.त्यांनी गुन्हेगारीत दहशत निर्माण केली असताना त्यांची बदली होणे गंभीर असल्याने ती का झाली याच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे.
२० एप्रिलला कृष्णप्रकाश यांची बदली झाली तेव्हा ते अमेरिकेला बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी गेले होते. तेथून २२ तारखेला ते परत आले. पण, त्यापूर्वीच त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अंकुश शिंदे यांनी २१ तारखेला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता.