पिंपरी : मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याने घरातून बाहेर काढल्याच्या रागातून सावत्र बापाने चार वर्षांच्या मुलासह आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड वाल्हेकरवाडी येथे घडली. ही घटना 6 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे.
सुमय्या नासिर शेख (41), आयान नासिर शेख (4) असे खून झालेल्याची नावे आहेत. तर नोमान उर्फ सोमेश्वर काळे (40) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी सुमय्या यांच्या मुलीने रविवारी (दि. 10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याने आईने सावत्र बापाला घरातून बाहेर काढले. या कारणावरून नोमान याने सुमय्या आणि भाऊ आयान यांच्यावर हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाल्हेकरवाडी येथील मोरया कॉलनीमध्ये एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी बंद खोलीत माय लेकरांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.