अधिवेशनाला वादळी सुरुवात; राज्यपाल कोश्यारींना आमदारांच्या घोषणाबाजीमुळे भाषण लागले घ्यावे आटोपते !

महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्देवी घटना : जयंत पाटील

0

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मिळाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. अपेक्षेनुसार अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. राज्यपालांना आपले अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपते घ्यावे लागले. 

नेहमीच्या पद्धतीनुसार राज्यपाल विधिमंडळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र, आज राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपले भाषण अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळले आणि ते निघून गेले. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाने कठोर भूमिका मांडली असून सत्ताधारी काँग्रेसकडून “राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

“महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठं स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे”, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.