पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरात रात्रीची संचारबंदी करण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीसांनी 42 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री 11 ते पहाटे 6 वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.
संचारबंदीच्या काळात या 42 ठिकाणी नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणा-यावर कारवाई केली जात आहे. तसेच विनामास्कर फिरणा-यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात 902 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 4 लाख 46 हजारांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत शहरात 2 लाख 28 हजार 560 विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 11 कोटी 6 लाख 6 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे.