मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. त्यामुळे एप्रिलपासून लावण्यात आलेले कडक निर्बंध 1 जूननंतर शिथिल करण्यात येतील. मात्र राज्यात रेड झोनमधील 14 जिल्ह्यांत कडक निर्बंध कायम राहणार आहेत, असे संकेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णसंख्या कमी होत असल्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांतील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे.
पुढच्या पाच ते सहा दिवसांत काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सध्या लोकल सुरू असून अजून पुढचे 15 दिवस तरी नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार नाही, असे ते म्हणाले. कोरोनाचा धोका कमी होत असला तरी लोकल सुरू झाली तर मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढेल. त्यामुळे सध्या लोकल मर्यादित नागरिकांसाठीच असणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दुसरी लाट ओसरत असल्याची सकारात्मक चिन्हे दिसत असून 21 जिल्ह्यांत नवे रुग्ण सापडण्याचा म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेट 0.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यात मुंबईने बाजी मारली असून सुरुवातीला 2.03 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या या शहरात 0.2 टक्क्यांपर्यंत हा रेट खाली आला आहे. त्याचप्रमाणे पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या शहरांत हा रेट राज्याच्या 0.7 टक्के पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा खाली आला आहे.
नगर , धाराशीव , बुलढाणा , कोल्हापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सांगली , सातारा , यवतमाळ , अमरावती , सोलापूर, अकोला , वाशीम , बीड , गडचिरोली हे चौदा जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंधांमध्ये घट झालेली नाही. रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यांत घरातच क्वारंटाइन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाइन केले जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरण ठेवण्यात अर्थ नाही. कारण यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित होतात, असे वडेट्टीवार म्हणाले.