पुणे : वाहतूक शाखेत कर्तव्यास असलेल्या आणि पोलिस उपायुक्त यांचे तात्पुरते रीडर म्हणून काम करत असताना 3.60 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात उपनिरीक्षकाचे (Sub-inspector) निलंबन करण्यात आले आहे. प्रथामिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. बसवराज धोंडीपा चिट्टे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे (Sub-inspector) नाव आहे.
12 मे रोजी लाच मागणीचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चिट्टे हे येरवडा वाहतूक विभागात नेमणुकीस होते. दरम्यान, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या रीडर यांची बदली झाल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार चिट्टे यांच्याकडे दिला होता.
यातील तक्रार एका मोठ्या कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीला शहरात होर्डिंग बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेची एनओसी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, यावेळी चिट्टे यांनी त्यांच्याकडे 3 लाख 60 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबत यातील तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत खात्या आंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनाचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत