पुणे : विवाहित असताना दुसऱ्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून, तरुणीचा गर्भपात करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त एन. डी. चव्हाण यांनी दिले आहेत.
हिमालय रामचंद्र जोशी असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते हडपसर पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. त्यांचे लग्न झाले आहे. तरीही त्यांनी नवी पेठेतील एका मुलीशी ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण केले. डिसेंबर 2019 पासून संबंधित तरुणी व जोशी लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात वाद झाले.
त्यानंतर जोशी यांनी तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधीत तरुणीने भरोसा सेलमधील महिला सहायता कक्षाकडे धाव घेत तक्रार दिली. त्याठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे.
जोशी हे पोलीस दलात अधिकारी असून विवाहित आहेत. तरीही एखाद्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे, तिला गर्भपात करायला भाग पाडणे हे पदास अशोभनीय आहे.
पोलीस दलाच्या प्रतिमेला बाधा आणणारे आहे. त्यांनी केलेले वर्तन पोलीस दलाला अशोभनीय आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी हिमालय जोशी यांना पोलीस खात्यामधून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीमध्ये त्यांनी पोलीस मुख्यालय पोलीस निरीक्षकांकडे दररोज हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.