‘उत्पादन शुल्क’च्या 4 बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

0
ठाणे : ठाण्यातील डान्सबार प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तलयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले. तर दोन सहायक पोलीस आयुक्तांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी (दि.20) केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन बारसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नटराज हे तीन डान्सबार सर्रासपणे सुरु असल्याची माहिती समोर आली. तसेच या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आल्याने पोलीस महासंचालकांनी लगेच पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना चौकशीचे आदेश दिले.

पोलिसांवर करण्यात आलेल्या या कारवाई पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांवरही कारवाईची मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ठाण्यातील उत्पादन शुल्कच्या ए विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आम्रपाली, अँटीक पॅलेस या बारवरील कारवाई हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला. बिट एकचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान सुरेंद्र म्हस्के  तसेच अँटीक पॅलेस या बारच्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बीट दोनचे दुय्यम निरीक्षक प्रदीप सर्जने आणि जवान ज्योतिबा पाटील  यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. कारवाईच्या जबाबदारी मध्ये अक्षम्य हेळसांड केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवला आहे.
निलंबनाबरोबर बदलीची कारवाई या चौघांच्या निलंबनाबरोबर त्यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीमध्ये दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान म्हस्के यांना रायगड जिल्ह्याच्या अधीक्षक कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. दर दुय्यम निरीक्षक प्रदीप सर्जने आणि जवान पाटील यांना पालघर अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.