शिक्रापूर : शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर अशोभनीय वर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी नुकतेच आदेश काढला आहे. तर पोलिस शिपाई इब्राहिम गणी शेख असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत आलेल्या आदेशानुसार, इब्राहिम गणी शेख यांची शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणूकीस असताना शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत कर्तव्यावर असताना हद्दीतील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून पैशाची वसुली करून अवैध धंद्यास प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर अवैध धंद्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, संशयित अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या मालकांशी परस्पर संपर्क केला असल्याचे निष्पन्न झाल्याचे आदेशात म्हटले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय वर्तन करून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्या मधील नियमाचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहून तात्काळ पोलिस सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढला आहे.
शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या इब्राहिम शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई पोलिस अधीक्षकांनी केल्याने शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील वसुली बहाद्दरांचे धाबे मात्र दणाणले आहेत. तर शिक्रापूर रांजणगाव शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारीदेखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेल्याने आता पुढील नंबर कोणाचा लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.