पुणे : बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेला मुख्य आरोपी सुनील देवकीनंदन झंवर याला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला.
झंवर यास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १०) दुपारी साडे बारा वाजता नाशिकमधील पंचवटी परिसरातून अटक केली. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरुन अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याबरोबरच शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातही ठेवीदारांची फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात आतापर्यंत जितेंद्र कंडारे, कर्जदार व इतर अशा १९ जणांना अटक झालेली आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत ७२ कोटी ५६ लाख २१ हजार १५६ रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. दागिने व रोख रक्कम मिळून ३० लाख ५ हजार ४३६ रुपयांचा ऐवज आतापर्यंत घरझडतीत मिळून आलेली आहे. दरम्यान, पतसंस्थेने पुण्यात २१ कोटी ३० लाखात खरेदी केलेल्या तीन मालमत्ता सुनील झंवर याने त्याच्या संस्था व त्याच्या सालासर कंपनीतील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढ्ढा याच्या नावाने अवघ्या ५ कोटी ७२ लाख ४४ हजार २२१ रुपयात खरेदी केल्याचेही उघड झाले आहे. त्यातही ४ कोटी २ लाख ३८ हजार ९१ रुपयांच्या ठेव पावत्या बेकायदेशीरपणे वर्ग केलेल्या आहेत.
झंवर त्याने काही इलेक्ट्रॉनिक्स पुरावे नष्ट केले किंवा लपवून ठेवले असावेत. फरार काळात तो कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास करायचा आहे. पिता-पुत्राच्या नावाने असलेल्या फर्मच्या नावे मालमत्ता विकत घेतल्या असून त्यासाठी झंवरनेच पैसा पुरविला आहे. कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत यासह कर्ज निरंक दाखले देखील या हार्डडिस्कमध्ये मिळून आल्याने ते कसे आले याची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी झंवर याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी झंवर याच्यावतीने युक्तिवाद केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुचेता खोकले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.