परमबीर सिंह यांना ‘सुप्रीम’ झटका ! अनिल देशमुखांविरूध्दची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

0
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. परमबीर यांनी राज्याचे (महाराष्ट्र) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती आरोप करत त्यांनी 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे टार्गेटच दिले होते असं म्हंटलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठानं प्रकरण गंभीर असल्याचं सांगत दाखल केलेली याचिका ही उच्च न्यायालयात दाखल करण्यास सांगितलं आहे. परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यास संमती दर्शविली असून ते आजच (बुधवार) उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत असं सांगण्यात आलं आहे.

परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल करून सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी केली होती तसेच देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करावेत असेही म्हंटले होते. याचिकेमधुन परमबीर यांनी त्यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरून दुसरीकडे झालेली बदली देखील रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार देत त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे.

परमबीर सिंह हे आजच त्यांचे वकिल मुकुल रोहतगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जाणार आहे. दरम्यान, परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यात चालु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या प्रकरणी अ‍ॅड. जयश्री पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं 30 मार्च ही तारखी सुनावणीसाठी निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं परमबीर यांची याचिका फेटाळल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे मात्र उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार असल्याचं त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.