पुणे : आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून विविध चर्चांनाही सुरूवात झाली आहे. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्याने तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस गेले होते असे सांगण्यात येत आहे. ठाकरे-फडणवीस भेटीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टिका केली आहे. सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले, दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेले याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी 105 आमदार असणारा नेता जातो. याचे काय करणार, तुम्ही? कोण कसा विचार करतात हे मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त त्यांच्या स्वार्थासाठी सुरु आहे.
दरम्यान, आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका असून त्यासाठी ठाकरे विरूद्ध ठाकरे असा सामना रंगवण्याची भाजपाची खेळी असून यासाठीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले आहे, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. सध्याचे चित्र पाहता अडचणीत सापडलेल्या शिवसेनेवर शिंदे गट तसेच भाजपाकडून ज्याप्रकारे हल्लाबोल केला जात आहे, त्यामध्ये मनसे सुद्धा आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठी ताकद लावावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवले होते.
फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरे यांच्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांचे फोन करून आभार मानल्याचे सांगितले होते. तसेच मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचेही म्हटले होते. शिवाय या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका असेही फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर आज ठाकरे-फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोन शस्त्रक्रिया झाली होती. म्हणूनच विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जात आहे.