पुणे : आपल्या ड्युटीची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. १० मे रोजी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पौड रस्त्यावर हा प्रकार घडला.
विजयकुमार सुभाष पाटणे असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी श्रावण शेवाळे या पोलिस कर्मचार्याला मारहाण केली होती.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, हे दोन्ही कर्मचारी पोलीस शिपाई असून कोथरूड पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. १० मे रोजी सुभाष पाटणे याने कर्तव्य नेमून दिलेल्या ठिकाणाहून पौड रस्त्यावर जात पोलीस शिपाई श्रावण शेवाळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. भर रस्त्यात हा प्रकार झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी हा सर्व प्रकार पाहिला होता. कोथरुड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या कानावर हा प्रकार दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणी स्टेशन डायरी नोंद केली होती.
दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता पोलीस शिपाई सुभाष पाटणे हा या घटनेत दोषी असल्याचे दिसून आले. त्याने काही कारण नसताना श्रावण शेवाळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. तर मध्यस्थी करणाऱ्या आणखी एका कर्मचाऱ्याच्या करंगळीला मार लागला होता. त्यानंतर सुभाष पाटणे याच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा, बेजबाबदार आणि बेशिस्तपणे वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.