साताऱ्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे निलंबन

0

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेली तक्रार अशा गंभीर आरोपांमुळे राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक आणि तत्कालीन साताऱ्याचे अपर पोलीस अधीक्षक धीरज शंकरराव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची बदली होमगार्ड विभागात केली आहे. धीरज पाटील यांच्या निलंबनाचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने काढले आहेत.

धीरज पाटील यांच्या विरोधात विद्युत विभागाच्याही अनेक तक्रारी आहेत. महत्त्वाच्या बंदोबस्तावेळी, मुख्यालयाची परवानगी न घेता बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यापान करुन गैरवर्तन करणे. स्वत:च्या वाहनावर लाल दिवा लावून फिरणे, अशा तक्रारी विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांची चौकशी प्रलंबित आहे. या प्रकरणात लोकायुक्त यांच्याकडेही तक्रार दाखल असल्याने राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांची बदली मुंबई होमगार्डच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. होमगार्डचे महासमादेशक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महासमादेशक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल व त्या कारणासाठी वेगळी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.