मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत महा विकास आघाडीला झटका दिला आहे. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता आम्ही स्वतंत्र आहोत. विशेष म्हणजे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून माझं नाव वगळा, अशी मागणी करण्यासाठी राजू शेट्टींनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला होता. “महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी (१ एप्रिल) सूचक इशारा दिला होता.