बेकायदेशीर पथारी, फेरीवाले यांच्यावर कारवाई करा…..
पी-1, पी-2 चे निर्बंध उठवा अन्यथा सोमवार पासून आंदोलनाचा व्यापा-यांचा इशारा.....श्रीचंद आसवाणी
पिंपरी : कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पिंपरी कॅम्प मधील व्यापा-यांवर पी- 1, पी- 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घातले आहे. हे निर्बंध ताबडतोब उठवा अन्यथा सोमवार पासून आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिला आहे.
सोमवार दि. 14 जून पासून मनपा प्रशासनाने पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घातले आहे. परंतू पिंपरी कॅम्प परिसरात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले मात्र राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे गर्दी होऊन वाहतूकीस अडथळा होत आहे. ज्या बाजूची दुकाने बंद असतात त्या बाजूला पथारीवाले दुचाकीवर वस्तू विक्रीची दुकाने थाटतात. दुपारी चार वाजेपर्यंतच दुकान सुरु ठेवण्यास परवानगी असल्यामुळे महानगरपालिकेने नेमलेले कोविड मार्शल चारनंतर लगेचच व्यापा-यांवर खटले भरायला सुरुवात करतात.
परंतू बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाल्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू मनपा प्रशासनाने व्यापा-यांचा विरोध डावलून फक्त पिंपरी कॅम्पमध्येच पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घातले आहे.
या लॉकडाऊनमुळे सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागतात. शनिवारी व रविवारी पुर्ण दिवस दुकाने बंद ठेवावी लागतात. पी-1, पी-2 मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतात. यातून कामगारांचे पगार देखील वसूल होणे अवघड आहे. व्यापा-यांना वीजबील व मिळकत करात आणि जीएसटीमध्ये सवलत मिळावी ही मागणी प्रलंबित असताना तसेच ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असताना व्यापा-यांवर बंधन घालणे अन्यायकारक आहे.
याबाबत फेडरेशनने वेळोवेळी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. याकडे देखिल आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. व्यापा-यांच्या मागणीवर आणि अडचणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवार दि. 21 जून पासून आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिला आहे.
व्यापारी मनपा प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करीत आहेत. ग्राहकांनी देखिल नियमांचे पालन करावे. मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापा-यांचा या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.