ज्येष्ठ महिलेचे राहते घर पाडणाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन : राहूल डंबाळे

0
पिंपरी : गवारवाडी (माण) येथिल माझे राहते चार खोल्याचे घर पोलिस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस दिलेली नसताना भर पावसात पाडून माझ्या कुटूंबाचा निवारा काढून घेतला. मला न्याय मिळावा यासाठी मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. मला व माझ्या कुटूंबाला न्याय मिळावा. अन्यथा सोमवारी (दि. 26 जूलै) मी माझ्या कुटूंबियांसह राहूल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार आहे असा इशारा बायडाबाई किसन सावंत या ज्येष्ठ महिलेने पिंपरीत पत्रकार परिषदेत दिला.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहूल डंबाळे यांनी या घटनेबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि. 22 जूलै) पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माण ग्रामपंचायत सदस्य अर्चना गवारे, रोहिदास किसन सावंत, राहूल डंबाळे, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर ऊबाळे, रिपब्लिकन युवा सेनेचे शहराध्यक्ष प्रमोद क्षिरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी बायडाबाई सावंत यांनी सांगितले की, मला माझ्या आईकडून हि 3 गुंठे जमिन मिळाली असून 2010 सालापासून या जागेबाबत आमचा पुणे सत्र न्यायालयात दावा सुरु आहे. या जागेची दोन वेळा शासकीय मोजणी झाली असून हि जागा एमआयडीसीच्या हद्दीत येत नाही. याचा दस्त व मोजणी अहवाल आमच्याकडे आहे. 1993 साली माण ग्रामपंचायतीमध्ये 8 अ च्या उता-यानुसार नोंद आहे. तरी देखिल एमआयडीसीचे अधिकारी मला व माझ्या कुटूंबियांना नाहक त्रास देतात. याबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही बेकायदेशीरपणे आमचे घर पाडले आहे. मला न्याय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी द्यावा अशीही मागणी बायडाबाई सावंत यांनी केली.
यावेळी राहुल डंबाळे म्हणाले की, या जागेच्या लगत असणा-या बांधकाम व्यावसायिकाचे हित डोळ्यापुढे ठेऊन एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिस अधिका-यांची हि अभद्रयुती आहे. राज्य सरकारच्या 29 जून 2021 च्या शासन आदेशानुसार पावसाळ्यामध्ये अधिकृत किंवा अनधिकृत कोणत्याही बांधकामावर कारवाई करता येत नाही. मा. सर्वोच्च न्यायालयानेही कोविडच्या जागतिक महामारीमध्ये कोणालाही बेघर करु नये असे आदेश दिले असतानाही हि कारवाई बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप राहूल डंबाळे यांनी केला. या कुटूंबियांना पुन्हा आहे त्याच ठिकाणी घर उभारुन द्यावे व या घटनेत दोषी असणा-या एमआयडीसी व पोलिस प्रशासनातील अधिका-यांवर कडक कारवाई करावी. या मागणीचे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (एमआयडीसी, वाकडेवाडी, पुणे) यांना दिले आहे. यावर ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा रिपब्लिकन युवा मोर्चा आणि सहयोगी पक्ष सोमवारी (दि. 26 जूलै) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करतील असाही इशारा डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Leave A Reply

Your email address will not be published.