पुणे : वेल्ह्याचे तलाठी मुकुंद चिर्के यांचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. हि घटना आज सकाळी घडल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
चिर्के हे नसरापूर येथे गेली 7 ते 8 महिने राहत होते. ते दररोज त्यांच्या मित्रांसोबत नसरापूर पासून 7 ते 8 किलोमीटर लांब असलेल्या वर्वे गावात जॉगिंग व तेथील तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे पावणेपाच वाजता ते घरून निघाले. चिर्के व त्यांचे मित्रा पोहण्यासाठी तलावात उतरले.
अर्ध्यात गेल्यानंतर चिर्के त्यांना म्हणाले, की ते दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन परत येणार आहेत. त्यामुळे मित्र परत किनाऱ्यावर आले. थोडे पुढे गेल्यानंतर चिर्के यांना दम लागला व ते मदतीसाठी आरडाओरड करू लागले. परंतु, मदतीसाठी कोणीही उपलब्ध नसल्याने काहीच वेळात ते तलावात बुडाले.