पुणे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशट्टी यांच्यासह दोघांवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन) 9 लाख रुपयांची लाच मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुख्याधिकारी शाम पोशट्टी यांना एसीबीने अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाम लक्ष्मणराव पोशट्टी (44) व विशाल अंकुश मिंड (33) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवक विशाल हे तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे उद्यान पर्यवेक्षक आहेत. यातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला तळेगाव दाभाडेनगर परिषद हद्दीत काम मिळालेले होते. हे काम पूर्ण झाले आहे. एकूण चार कामांचे बिल राहिले होते. हे बिल काढण्यासाठी ते पाठपुरावा करत होते.
हे बिल काढून देण्यासाठी लोकसेवक विशाल यांनी 9 लाख रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तर या लाचेच्या मागणीला मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशट्टी यांची सहमती होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी करून लाच मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोशट्टी यांना एसीबीने अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.