पिंपरी चिंचवडकरांसाठी आजपासून ‘टॉक टू कॉप्स’ मोहीम

0

पिंपरी : शहरातील नागरिकांना पोलीस खात्याकडून खूप अपेक्षा आहेत, अनेक कामे पोलिसांनीच करावीत, असा समज आहे. त्यामुळे पोलिसांना काय अधिकार आहेत, ते कोणती कामे करु शकतात याची माहिती नागरिकांना होण्यासाठी आणि नागरिकांच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत हे थेट जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘टॉक टू कॉप्स’ ही मोहीम सुरु केली आहे. याची सुरुवात आज बुधवार पासून होणार आहे.

या मोहिमेद्वारे पोलीस आयुक्त शहरातील ठिकठिकाणी जाऊन नागरिकांच्या व समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच पोलिसांच्या कर्तव्याबाबत देखील नागरिकांना सांगणार आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “शहरात अनधिकृतपणे फ्लेक्स लावले जातात. त्या फ्लेक्सवर पोलिसांनी कारवाई करावी. काही ठिकाणी गौण खनिजांची चोरी केली जाते. त्यावर पोलिसांनी थेट कारवाई कारवाई, अशी नागरिक मागणी करतात. मात्र, अशा अनेक अनेक गोष्टींवर पोलीस थेट कारवाई करू शकत नाहीत.

अनधिकृत फ्लेक्सवर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. फौजदारी प्रश्न उद्भवल्यास पोलिसांची मदत घेतली जाते. पुढे गुन्हा दाखल करणे आणि अन्य बाबींचा समावेश होतो. परंतु अनधिकृत फ्लेक्स शोधा, त्यावर कारवाई करा, अशी थेट मागणी नागरिकांकडून केली जाते.

नागरिकांकडून केली जाणारी मागणी देखील गैर नाही. शहरात सुरु असलेल्या अवैध, बेकायदेशीर आणि त्रासदायक गोष्टी पोलीस बंद करतील, त्याला आळा घालतील, असा नागरिकांना विश्वास असतो. त्याच विश्वासाने ते पोलिसांकडे येतात.

पोलिसांचे नेमके काम काय आहे, कोणत्या बाबतीत पोलीस थेट भूमिका बजावू शकतात, हे नागरिकांना माहिती असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुधवारी (दि. 30) दुपारी पाच ते सायंकाळी सात या वेळेत केशवनगर, चिंचवड येथील कल्याण प्रतिष्ठान येथे ‘टॉक टू कॉप्स’ या मोहिमेचा आरंभ होणार आहे. प्रत्येक आठवड्यात एक दिवस शहरातील एका भागात ‘टॉक टू कॉप्स’ अंतर्गत संवाद साधला जाणार आहे.

चिंचवड पाठोपाठ पिंपळे सौदागर, सांगवी, चाकण, देहूरोड, वाकड येथे हा ‘टॉक टू कॉप्स’ कार्यक्रम होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि महासेतू सोल्युशन्स एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.