मावस बहिणीवर अत्याचार करणा-या भावाला दहा वर्ष सक्तमजुरी

0

पुणे : मावस बहिणीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणा-या २५ वर्षीय भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला.

एक मार्च २०१७ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नवी सांगवी परिसरात ही घटना घडली. याबाबत ४० वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा सहा वर्षांपासून त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने १५ वर्षीय अल्पवयीन पिडीतेला फुस लावून पळवून नेत भाड्याच्या खोलीत ठेवले. तुझे वय १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे खोटे सांगुन त्याने तिच्या इच्छेविरुध्द संबंध ठेवल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करत दोषारोपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकिल विलास घोगरे पाटील यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामाकाजासाठी सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस संजय बनसोडे व राजेंद्र सोनवणे यांनी मदत केली. आरोपीचे घटनेच्या पुर्वीपासून पिडीतेशी प्रेमसंबंध होते. त्यास तिची संमती होती, असा बचाव आरोपीच्या वकिलांनी केला. त्याच्या मुद्द्यांना अ‍ॅड. घोगरे पाटील यांनी विरोध केला.

आरोपीच्या म्हणण्यानुसार पडितेची संमती असली तरी ती अल्पवयीन आहे. त्यामुळे, कायद्याने तीची संमती ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे आरोपीस बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.