ट्रकचालकांना लुटणा-‍या तीन दरोडेखोरांना दहा वर्षे सक्तमजुरी

0
पुणे : ट्रकमध्ये झोपलेल्या चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी साडेदहा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला.
विजय उर्फ विज्या बिभीषण काळे, बाजीगर उर्फ बि-‍या वाघमन्या काळे, उद्देश बिभिषण काळे (सर्व रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री तीनच्या दरम्यान हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे हा गुन्हा घडला होता. घटनेच्या दिवशी गणेश शिंदे, रामधारी यादव, धनंजय पोनकालापाडू, रावसाहेब शेजाळ, रवी कोटी, राहुल सिंग हे ट्रकचालक आपले ट्रक सोरतापवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मागे मोकळ्या जागेत लावून ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. या वेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून गणेश शिंदे यांच्या उजव्या खांद्यावर व डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ट्रकचालकांकडून ६६ हजार रुपये रोख, तसेच सोन्याचे दागिने, मोबाईल आदी ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये आरोपी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवार्इ करण्यात आली. या गुन्ह्यातील टोळीने आतापर्यंत २६ गंभीर गुन्हे केले आहेत, असे पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद आहे.या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास दोषींना आणखी अडीच वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.