मुंबई : राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
कोरोना काळात शाळांनी शुल्क आकारण्याच्या मुद्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतले आहेत. राज्य शासन पालकांसोबतच आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाउन काळात नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले, याची पूर्ण जाणीव शासनाला आहे. शासन आपली बाजू न्यायालयात मांडेल. दरम्यानच्या काळात शाळा अन्यायकारक वागत असतील, असा पालकांचा आक्षेप असेल तर त्यांनी शिक्षण विभागाशी, उपसंचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
दहावी-बाराीच्या परीक्षांच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्याचे सत्र वाया जाणार नाही. त्याची फेरपरीक्षा घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.