काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केले दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ले

0

श्रीनगर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळा साजरा होत असतानाच हल्ले करण्याची कारस्थाने दहशतवाद्यांनी आजही सुरूच ठेवली. काश्मीर खोऱ्यात सोमवारी स्वातंत्र्यदिनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ले केले.

या हल्ल्यांत एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हल्लेखोर दहशतवादी अजूनही फरार असल्यामुळे त्यांच्याकडून आणखी हल्ले केले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दले सतर्क असून, काश्मीर परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि घेराबंदी घालून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. ऐन स्वातंत्र्यदिनी केलेल्या दोन हल्ल्यांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यांबद्दल जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी ग्रेनेड हल्ले करण्यात आले. त्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली आहे. पहिल्या घटनेत दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात ग्रेनेड फेकले, त्यात एक सर्वसामान्य नागरिक जखमी झाला. करण कुमार सिंग असे त्या जखमी नागरिकाचे नाव असून, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

दुसऱ्या घटनेत पुन्हा एकदा सुरक्षा दलांना टार्गेट करण्यात आले. श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाच्या बाहेर ग्रेनेड फेकण्यात आले. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. काल (रविवारी) दोन वेगवेगळ्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले. यापूर्वी शनिवारीही श्रीनगरमधील सीआरपीएफ कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेडने हल्ला केला. त्यात एक तरुण जवान गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवत आहे.

गेल्या काही दिवसांत श्रीनगर आणि जम्मू-काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये हल्ले करण्याची ही पहिली घटना नाही. 4 ऑगस्टला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हा हल्ला घडवून आणल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले होते. बडगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला होता, तर दुसरा मजूर जखमी झाला होता.

अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडल्या आहेत. श्रीनगर शहरातील लालबाजार भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला तर दोन जण जखमी झाले होते. तसेच लाल बाजार भागातील जीडी गोयंका शाळेजवळील पोलिस नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर हेड कॉन्स्टेबल अबू बकर हे जखमी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.