पुणे : पुण्यातल्या टीईटी परीक्षा 2019-20 प्रकरणात पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. 3955 पानांच हे दोषारोप पत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तुकाराम सुपे, सुखदेव ढेरेसह 15 आरोपी अटकेत आहेत. मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून या प्रकरणात अजून 12 आरोपी फरार आहेत.
टीईटी प्रकरणात अनेक खुलासे होत होते, अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आत्तापर्यंत जे पंधरा आरोपी यामध्ये निष्पन्न झाले त्यामध्ये तुकाराम सुपे याच्यासह अनेक महत्त्वाच्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर आज पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात नक्की काय घडलं ? यामध्ये कशा पद्धतीने कट रचला गेला. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास 12 लोकांचा यामध्ये शोध सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य भरतीच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुणे सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान टीईटी परीक्षा पेपरमध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेच धागेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता. पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारला त्यावेळी कोट्यावधी रुपयांची संपत्ती पोलिसांना सापडली.