चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट आक्रमक; ८ पदाधिकाऱ्यांची केली हकालपट्टी

0

मुंबई : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अशातच प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच आता चिंचवडमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलेलं असताना आता राहुल कलाटे यांना मदत करणाऱ्या शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह आठ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे आज चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो करणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाने चिंचवडमध्ये ही मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शहराध्यक्ष सचिन भोसले आणि जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मदत करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना मदत करताना काही शिवसैनिक दोषी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर हे पदाधिकारी पक्षादेशाविरोधात काम करत होते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यात राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचेच टेन्शन वाढवलं आहे. दुसरीकडे राज्यभरात शिवसेनेची युती असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने देखील राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने कलाटे यांचे पारडं जड वाटत होतं. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही नेते आणि पदाधिकारी हे राहुल कलाटे यांचं काम करत असल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यानंतर शहराध्यक्ष सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार आणि ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत याविषयी सविस्तर माहिती दिली होती.

दमरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश सचिन भोसले आणि गौतम चाबुकस्वार यांना दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.