ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. थोड्याच वेळात ते प्रत्यक्ष अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल, त्यांचे सर्वांशी असणारे सहकाराचे नाते, यामुळे आज मला हा आशीर्वाद मिळाला.भाजपचेही मी आभार मानते. माझाही ध्यास अंधेरीचा विकास हाच असेल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आज राज्यातील भाजप नेते व केंद्रीय नेतृत्वाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेत आहे. भाजपने यापूर्वी अनेकदा असे निर्णय घेतले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून भाजप असे निर्णय घेत आला आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या निधनामुळे तिथे त्याचे कुटुंबच पोटनिवडणुकीला उभे राहत असेल, तर तेथे उमेदवार द्यायचा नाही, असे भाजपने यापूर्वीही केले आहे. तोच निर्णय आता घेतला आहे.