पिंपरी : तळेगाव दाभाडेमधील इंद्रपुरीतील महिलेचा मृत्यू अपघातात झाला नसून तिचा खून करण्यात आला आहे, असे तिच्या शवविच्छेदनातून समोर आले आहे,अशी माहिती देहूरोडचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले- पाटील यांनी दिली आहे.
संगीता भोसले (38, रा. मंत्रा सिटी , तळेगाव दाभाडे) असे मृत महिलेचे नाव आहे.त्या सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रपुरी येथील भंडारी व्हिला जवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या. खराब रस्त्यामुळे स्कूटर घसरून अपघात झाला असावा, असे समजून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
अधिक माहिती देताना, भोसले-पाटील म्हणाले की, “संगीता भोसले या सकाळी आठच्या सुमारास दूध खरेदीसाठी त्यांच्या दुचाकीवरून दुकानात गेल्या. तेथून इंद्रपुरी येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांच्या घरी जात असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या गळ्यावर वार केले होते.”
ते पुढे म्हणाले की, “त्यांना जखमी अवस्थेत तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शवविच्छेदनाच्या वेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने झाल्याचे आढळून आले. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संगीता भोसले यांचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.