डब्बल मर्डर, हाफ मर्डर, किडनॅपिंग करुन फरार झाला होता 23 वर्षीय तरूण…
वाचा सविस्तर... कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी : सासरा आणि मेहुण्याचा खून करुन, आजे सासऱ्यावर खुनी हल्ला करुन स्वतःच्या बायकोला जबरदस्तीने पळवून आणणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. हा प्रकार अमरावती येथे करुन तो पुण्यात आला होता.
रवी सुरेश पर्वतकर (23, रा. महावीर काॅलनी, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सासरा बंडू साबळे, मेव्हणा धनंजय साबळे, असे खून झालेल्यांची नावे आहेत. तसेच, आजेसासरा विश्वनाथ साबळे हे देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याची पत्नी हर्षा (22) तिच्या माहेरी कुरडपर्णा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे गेली होती. तिला घेण्यासाठी आरोपी रवी हा रविवारी (दि. 14) कुरडपर्णा येथे गेला. त्यावेळी सासरच्या लोकांशी त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला.
त्यावेळी रवी याने सासरा बंडू साबळे, मेव्हणा धनंजय साबळे यांचा चाकूने भोसकून खून केला. तसेच आजेसासरा विश्वनाथ साबळे यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, पत्नी हर्षा हिला मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून घेऊन अमरावती येथे गेला. तेथून ट्रॅव्हल्स बसने तो पुणे येथे आला.
दरम्यान, पिंपरी–चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना आरोपी रवी पिंपरी- चिंचवड येथे येत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, सोमवारी (दि. 15) त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे खेड तालुक्यातील कुरुळी येथून आरोपी रवी याला ताब्यात घेऊन त्याची पत्नी हर्षा हिची सुटका केली.
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक निरीक्षक उमेश लोंढे, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी अमित खानविलकर, सोमनाथ बोऱ्हाडे, गणेश महाडिक, सुनील चाैधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, मंगल वलवे, मंजुषा रोजोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.