काडं अन् जोकाड जुंपली त्यांच्यापुढे घोडेस्वार म्हणून होते 75 वर्षांचे मधुकर नाना पाचपुते. नाद महाराष्ट्राच्या मातीतला, अंगावर शहारे आणणारा क्षण, घाटात भिररररचा आवाज आला, शर्यतीला सुरुवात झाली अन् नानांची आदाकारी सुरु झाली.
घोडेस्वारी करतानाची नानांची आदाकारी, त्यांचा तो थाट, एखाद्या विशितल्या तरुणाला देखील लाजवेल असा होता. त्यांच्या आदाकारीला उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली.
पाचपुते यांना शर्यतीत बैलजोडीपुढे घोडी पळवण्याचा छंद आहे. डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा, गळ्यात उपरण आणि धोती-कुर्त्याचा पेहराव करुन नाना घोड्यावर स्वार होतात.
वयाच्या पंच्याहत्तरीतही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शरीराची हालचाल भल्याभल्यांना लाजवणारी ठरते. पाचपुते यांना घोडेस्वारीला सुरुवात करुन जवळपास 50 वर्षे झाली.
बैलगाडीचा नाद अन् अंगात असलेला हौशीपणा यामुळे त्यांच्यात घोडेस्वारी मुरत गेली. पंचक्रोशीत कोठेही बैलगाडा शर्यत असली की त्याठिकाणी ते हजर असतात. लगाम न घालताही घोडीला आवरायचे कसब त्यांच्यात असल्याने कितीही बेभान असलेली घोडी ते आवरतात.
याबाबत मधुकर पाचपुते म्हणाले, 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शर्यत सुरु झाली. शर्यत सुरु झाल्याने आनंदाला पारावर राहिला नाही.
बैलगाडा शर्यत ही आमच्यासाठी जीव की प्राण.
त्यामुळे घोडीवर बसून शर्यतीचे सारथ्य करणे हे जिकरीचे असले तरी त्यात मिळणाऱ्या आनंदाला सीमा नाही.