पिंपरी : दुचाकीला धडक देऊन पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून हाताचा चावा घेतला. हा प्रकार निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.27) साडेपाचच्या सुमारास घडला.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई देवबा मधुकर थोरात (36) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चंद्रकांत अंकुश चव्हाण (34 रा. रुपी हौ. सोसायटी, रुपीनगर, तळवडे) याच्यावर आयपीसी 353, 332, 279, 337, 427, 504, 506, मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ओटास्किम येथे स्वप्नील पवार (38) यांच्या अॅक्टीवा गाडीला आरोपीच्या कारची धडक बसली. यामध्ये पवार हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर आरोपी पळून जात असताना पवार आणि घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्याला पकडले. पवार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली.
नियंत्रण कक्षाकडून घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नंदुर्गे हे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने नंदुर्गे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या ड्रेसची कॉलर पकडली. आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने मोठ्याने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके हे त्याठिकाणी आले.आरोपीने शेळके आणि विधाटे याच्यासोबत हुज्जत घातली. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली.
आरोपीने तुम्ही पोलीस माझ्यावर कशी करावाई करता हेच पाहचो असे
म्हणून पोलीस शिपाई विधाटे यांच्या हाताचा चावा घेऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी करीत आहेत.