यवतमाळ : पुणे पोलिसांनी क्रिकेट सट्ट्याचा गुन्ह्याचा तपास केला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले. आरोपीला ताब्यात घेऊन पुणे पोलीस यवतमाळ येथे आले. याठिकाणी एका हॉटेलमध्ये पोलिसांनी आरोपीसह मुक्काम केला. शुक्रवारी (दि.1) पहाटे आरोपी पसार झाला. रामदेव मोहनलाल शर्मा (43) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख गुन्ह्याचा तपासासाठी आले होते. त्यांनी किनवट येथून रामदेव शर्मा याला अटक केली होती. यवतमाळातही क्रिकेट सट्ट्याच्या अनुषंगाने काही आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस रामदेवला घेऊन यवतमाळ येथे मुक्कामी थांबले होते. त्यांनी दारव्हा मार्गावरील एका हॉटेलात मुक्काम केला होता.
शुक्रवारी पहाटे आरोपी रामदेव शर्मा हा पोलिसांची नजर चुकवून पसार झाला.
हा प्रकार लक्षात येताच पुणे पोलिसांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तेथील पोलिसांना आरोपी पसार झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.
अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपी रामदेव शर्माचा शोध सुरु केला आहे.