फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीकडे मिळाले कोट्यवधी रुपयांचे बनावट डीडी
कमिशनच्या आमिषाने सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक
पुणे : ट्रेड फंडचे सात कोटी रुपये बँकेतून कंपनीच्या खात्यावर ट्रांन्सफर करून त्याद्वारे कमिशन मिळून देण्याच्या आमिषाने सव्वा सात लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे कोट्यवधी रुपयांचे बनावट डीडी सापडले आहे. त्यामुळे आरोपीने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या सर्व डीडींचा पंचनामा केला आहे. राजकुमार वाणी (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिल भिकू मस्के (वय ४७, रा. टिंगरेनगर) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. १३ एप्रिल ते १८ मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. या गुन्ह्यातील आरोपी जयदीप गोस्वामी ऊर्फ दादा याचा पोलिस शोध घेत आहेत. वाणी याने फिर्यादींना तो ट्रेड फंड कंपनीमध्ये बिझनेसचे काम करत असल्याचे भासवले. त्या कंपनीत ट्रेड फंड द्वारे बँकेतून ट्रेड फंडचे सात ७ कोटी रुपये हे कंपनीच्या खात्यावर ट्रान्स्फर करतो आणि त्याद्वारे तुम्हाला कमिशन मिळून देतो, असे आमिष त्याने फिर्यादींना दाखवले.
या ट्रेड फंडचे डीडी पास करण्यासाठी व आरटीजीएस करण्यासाठी फी म्हणून वाणी याने एका बँक खात्यावर २ लाख २५ हजार तर दुस-या बँक खात्यावर ५ लाख रुपये असे एकूण ७ लाख २५ हजार रुपये भरण्यास सांगून फिर्यादींची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर बाबींचा तपास करण्यासाठी वाणी याच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने वाणीच्या पोलिस कोठडीत २८ मेपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.