पोलीस कोठडीचे लोखंडी गज कापुन दरोड्यातील आरोपीचे पलायन

0

भोर (माणिक पवार) : दरोडा, चोरी, प्राणघातक हल्ले अशा पंचवीसहून अधिक गंभीर गुन्हे दाखल मोक्यातील अटक असलेल्या दोन आरोपीनी पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेत फिल्मी स्टाईलने भोर पोलिस ठाण्याच्या कोठडीचे लोखंडी गज कापून पलायन केले आहे. या संशयास्पद घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

भोर पोलीस स्टेशनच्या कोठडीतुन चंद्रया उर्फ चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे वय ३२ ( रा. ढवळ, ता. फलटण जि. सातारा व प्रवीण प्रल्हाद राऊत २९ ( रा. चिखली, ता. इंदापूर जि. पुणे ) अशी पलायन केलेल्या सराईत आरोपींची नावे असून हि घटना भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पहाटेच्या सुमारास घडली आहे. गेल्या महिन्यात पुणे सातारा महामार्गावरील कापूरव्होळ ( ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकून फरार झाले होते. अथक तपासानंतर एलसीबीच्या पथकाने या आरोपींना जेरबंद केले होते. तपासकामी राजगड पोलिसांनी पलायन केलेले आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत यांना ताब्यात घेऊन भोर कोठडीत ठेवण्यात आले होते.

सदर आरोपीच्या बंदोबस्तासाठी राजगड पोलीस ठाण्यातील ४ पोलीसांची वरील गुन्हेगारांना ठेवलेल्या कोठडीच्या बंदोबस्तांसाठी नेमणुक केली होती. कालच आरोपीना भोर न्यायालयात नेण्यात आले होते. माञ आज पहाटे पोलिस कोठडीचे गज कापुन दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत कोठडीतून पोबारा केला आहे. त्यामुळे राजगड पोलिसांसमोर आता पुन्हा फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन उभे राहिले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक राजू मोरे, विनायक वेताळ, गुन्हे शाखेचे पथक यांनी भेट देऊन पाहणी केली असून तपासकामी चार पथके पाठविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आरोपींना कुणी मदत केली?

भोर पोलीस कोठडीत चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत या दरोड्यातील आरोपी बरोबर इतर वेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी कोठडीत होते. लोखंडी गज हा किमान चार दिवसापासून थोडे थोडे कापण्यात आल्याचे दिसून आले असून आरोपींना एक्सा ब्लेड कुणी दिले अथवा यात कोणी मदत केली असा सवाल उपस्थित होत असून याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.