पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची रक्कम आता थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे . महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय झाला असून कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश मिळाले असल्याचे मत महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी व्यक्त केले आहे .
पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाकडून याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ व वर्ग ४ मधील सर्व गणवेश देय कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश तसेच पावसाळी व हिवाळी साधने पुरवण्यात येतात. याबाबत वेळोवेळी निविदा प्रसिद्ध केल्या जायच्या.
परंतु कायमच दिरंगाई होत असे. तसेच कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणा-या साधनांचा दर्जा सुमार असायचा. यामध्ये होत असलेली कर्मचा-यांची पिळवणुक लक्षात घेवुन यामधुन कर्मचाऱ्यांच्या कशाप्रकारे सोडवणुक करता येईल या दृष्टीकोनातून यासाठी राज्य शासनाच्या डिसेंबर २०१६ चे परिपत्रका प्रमाणे लाभार्थ्यांना देय रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरणाचा अवलंब करण्यात आला.
त्याच धर्तीवर महासंघाच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी प्रशासनाकडे याबाबत लेखी मागणी करण्यात आली होती. व याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कर्मचाऱ्याना गणवेशा ऐवजी थेट रक्कम कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश पारित केला आहे . त्यामुळे कर्मचारी गणवेशाबाबत यापुढे कोणतीही दिरंगाई अथवा हस्तक्षेप न होता कायमस्वरुपी गणवेशाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.